Saturday, May 17, 2014

"कानोसा राजकारणाच्या ,सत्ताकारणाच्या बदलत्या दिशेचा … "
-रश्मी घटवाई 


देशभर सध्या केवळ आणि केवळ येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांबद्दल चर्चा सुरू आहे. टीव्ही, वृत्तपत्रे,फेसबुक -ट्वीटर सारखी सोशल मिडिया ही सगळी माध्यमेच काय,पण सर्वसामान्य माणसाच्या विश्वातसुद्धा सध्या राजकारणावर खमंग चर्चा झडते आहे. तसेही राजकारण,क्रिकेट आणि हिंदी चित्रपट ह्या त्रिविधा आपल्या भारतीयांच्या जीवनाच्या अविभाज्य घटक आहेत.हे विषय श्वासोच्छ्वासइतक्याच सहजपणे भारतीय माणसाच्या बोलण्यात येतात.त्यात अलीकडे झालेल्या पाच राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकांमुळे आणि त्यांच्या निकालांमुळे राजकारणाची दिशा बदलली. पाच राज्यातल्या विधानसभेच्या ह्या निवडणुकांकडे तर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम अथवा सेमीफायनल ह्याच दृष्टीने पाहिलं गेलं.त्यामुळे राजकारणाच्या आणि सत्ताकारणाच्या बदलत्या दिशेबद्दल सबंध देशातच चर्चांना नुसते उधाण आले आहे.

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत छत्तीसगढच्या 90,मध्यप्रदेशच्या 230,राजस्थानच्या 200,दिल्लीतल्या 70
आणि मिझोरामच्या 40 अशा पाच राज्यांतल्या विधानसभेच्या एकूण  ६३० जागांसाठी मतदान झालं. देशातली जनता काँग्रेसच्या भ्रष्ट सत्तेला पुरती विटल्याचं त्यांच्या निकालांतून स्पष्ट झालं.मध्यप्रदेश, राजस्थान,छत्तीसगढ तसंच दिल्लीतही जनतेनं आपला निर्विवाद कौल भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात टाकून येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय चित्र असेल ह्याची नांदीच सदर केली.दिल्लीत मात्र विधानसभेत निवडून आलेला प्रथम क्रमांकाचा पक्ष असूनही पूर्ण बहुमत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून वंचित रहावं लागलं. दुसऱ्या क्रमांकावर विधानसभेत निवडून आलेली 'आम आदमी पार्टी 'ज्या काँग्रेसला सत्तेतून उखडून भारतीय राजकारणातून दूर भिरकावून देण्याच्या आणि भ्रष्टाचार मिटवण्याच्या आणाभाका घेऊन,जनतेला तशी आश्वासने देऊन आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येनं जागा जिंकून आली होती,तिनं काँग्रेसच्याच मदतीनं सत्तेची सूत्रे हाती घेतली. "हमारी औकात ही क्या है जी,हम तो बस आम आदमी है ।"असे उठता-बसता टीव्ही
चॅनलवर सांगणारे अरविंद केजडीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.सत्तांतर घडवून काँग्रेसच्या कचाट्यातून सुटू बघणारा दिल्लीकर बेमालूमपणे ठगला गेला आणि पुन्हा अलगदपणे काँग्रेसच्याच विणलेल्या जाळ्यात सापडला.
 
आपण निवडून येताच पहिलं काम म्हणजे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर गेली १५ वर्षे विराजमान असलेल्या शीला दीक्षित यांच्या भ्रष्टाचाराला लोकांसमोर आणणार आणि त्यांना तुरुंगात पाठवणार असं सांगणारया अरविंद केजडीवाल यांची भाषा एकाएकी कशी बदलली,ते आता शीला दीक्षित यांच्याविरुद्ध पुरावे कुठे आहेत वगैरे म्हणू लागलेत,शीला दीक्षित ह्यांच्याविषयी तर ते चकार शब्द बोलेनासे झालेत आणि कसलेल्या मुरब्बी राजकारण्याला लाजवेल अशी या बोटावरची थुंकी त्या बोटावर कशी फिरवू लागलेत याचाच अचंबा आता दिल्लीतल्या जनतेला वाटतो आहे.स्पेशल छब्बीस ह्या खिळवून ठेवणाऱ्या चित्रपटात जिमी शेरगिल ह्या अभिनेत्यानं केलेली भूमिका केजडीवाल करताहेत अशी दिल्लीकर जनतेला साधार भीती वाटते आहे.सत्तेसाठी आपण काँग्रेस किंवा भाजपा कुणाचंही समर्थन घेणार नाही असं म्हणणाऱ्या केजडीवालांनी सरड्यासारखा पटकन रंग बदलला आणि आपल्याला फसवलं अशी दिल्लीकर जनतेची धारणा आहे.आपण अधिकाधिक कसे अतिसामान्य दिसू ह्या प्रयत्नात असलेले केजडीवाल भल्याथोरल्या पाच बेडरूमच्या दोन सदनिकांमध्ये राहायला सज्ज झाले होते,पण जनतेनं केलेल्या टीकेमुळे त्यांनी माघार घेतली याचाच अर्थ केजडीवालांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत ह्या भावनेनं दिल्लीकर जनतेला आपला विश्वासघात झालाय असं वाटतंय .   
दिल्ली-नोएडा मधल्या,सर्व स्तरांमधल्या अनेक लोकांशी मी ह्या विषयावर चर्चा केली." केजडीवाल और काँग्रेसमें डील हुई है " असं सगळ्यांनाच वाटतं आहे. अनेकांना वाटतंय की त्यात पैशांची देवाण-घेवाण झाली आहे,तर काहींच्या मते ही डील अशी आहे की 'आम आदमी पार्टी ' ला काँग्रेसने विधानसभेत हात दिला तर त्याबदल्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कमी खासदार निवडून आले असले (ते कमीच असणार आहेत हा भाग वेगळा!)आणि 'आम आदमी पार्टी 'चे अधिक खासदार निवडून आले असले तरी काँग्रेसचाच पंतप्रधान असेल.बहुतेक सर्वांनाच वाटतंय की दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आपण काही जिंकणार नाही ह्याची काँग्रेसला खात्री होती.मात्र भाजपा सत्तेत येऊ नये,त्यांची मते विभागली जावी म्हणून काँग्रेसनंच 'आम आदमी पार्टी 'ला फळू-फुलू दिलं आणि स्वत: केजडीवाल काँग्रेसवाले आहेत.अनेकांना वाटतं की केजडीवाल किंवा त्यांच्या 'आम आदमी पार्टी नं डाव्या पक्षांवर कधीच टीका केली नाही आणि त्याचं कारण म्हणजे त्या पक्षाचे योगेंद्र यादव आणि कुमार विश्वास हे दोघेजण वामपंथी आहेत.गम्मत म्हणजे बहुसंख्य लोकांना वाटतंय की 'आम आदमी पार्टी 'च्या नेत्यांमध्ये आणि त्यातही कुमार विश्वास ह्या नेत्यामध्ये सत्ताप्राप्तीनंतर देहबोलीत कमालीचा गर्व दिसू लागलाय."उं,आपण काय चुटकीसरशी अमेठीमध्ये राहुल गांधींचा पराभव करू" असल्या प्रकारची कुमार विश्वास ह्या नेत्याची दर्पोक्ती ऐकून अगदी कट्टर काँग्रेसविरोधी लोकसुद्धा चीड व्यक्त करताहेत.एकतर त्यांचा कुणीही सोम्यागोम्या उठतो आणि वक्तव्ये देऊ लागतो.'आम आदमी पार्टी 'उथळ आचार-विचार असलेल्यांचा पक्ष आहे .त्यामुळे Power corrupts.Absolute power corrupts absolutely अशी त्यांची गत होणार-नव्हे होते आहे.

अण्णा हजारे ह्यांच्या दिल्लीतल्या जनलोकपाल साठीच्या जनआंदोलनात मोठा सहभाग असलेल्या 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' ह्या संस्थेच्या मूळ संस्थापकांपैकी एक गौरव बक्षी ह्याच्याशीही मी दीर्घ संवाद साधला.त्या काळात भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारा तो टीव्हीवरचा एक  ओळखीचा चेहरा झालेला होता.अमेरिकेतल्या जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीमधून फायनान्समध्ये एमबीए केलेला आणि अमेरिकेतल्या दहा वर्षांच्या वास्तव्यानंतर भारतात परतलेला गौरव बक्षी हा नोएडातलातरुण आता जाहिरातविश्वातही आपली चुणूक दाखवतो आहे.त्याच्यामते केजडीवालांनी अशा प्रकारे समर्थन घेणं हेच चूक आहे.त्यांची खरी परीक्षा सरकार चालवतेवेळी होईल .त्याच्यामते नरेंद्र मोदी  हेच खरेखुरे लीडर आहेत,त्यांना मोठा जनाधार आहे. 

सध्याची काँग्रेसपक्षाची स्थिती अगदी पोरं -टोरं सुद्धा सांगू शकतील .एक तर लाखो-करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराबद्दल सबंध देशानं त्यांना आताच मतं नं देऊन सणसणीत चपराक लावलेली आहे.सोनिया गांधी ह्यांची साथ नं देणारी प्रकृती बघता आज न उद्या त्या आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी आपल्या मुलाला,राहुल गांधींना बसवणार आहेतच.काँग्रेसजनांनी कितीही आव आणला तरी काँग्रेसपक्षाला भीती आहे,ते जे नाणे खणखणीत वाजवून दाखवू इच्छितात,ते खोटं ठरेल.राहुल गांधींना जनतेनं नेता म्हणून स्वीकारलेलं नाही. उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत त्याचं प्रत्यंतर आलं. पण आता चंद्रबळ आणून कसबसं आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी कुणीतरी गांधी त्यांना लागणारच.राहुल गांधी तर राजकारणात नापास झाले आहेत,हे सत्य लपून राहिलेलं नाही.प्रियंका गांधींना आणावं तर राहुल गांधी नापास झाल्याचं स्वत:हून कबूल करण्यासारखं आहे.
" घर में दो बहनें हों,बडी साधारण और छोटी ज्यादा सुंदर और होशियार हों,तो बडी बहन के सगाई के समय छोटी को सामने नहीं आने देते!"असं लोकांचं प्रांजळ मत आहे.तात्पर्य,त्यामुळे काँग्रेस पक्षात पंतप्रधानपदाचा उमेदवार आधी घोषित करायची परंपरा नाही म्हणून दिग्विजयसिंग सांगताहेत. गम्मत बघा,दिग्विजयसिंग जे काही बरळत असतात,ते कुणा दुसऱ्या इसमानं म्हटलं असतं तर काँग्रेस पक्षातून त्याची कधीच गच्छंती झाली असती. ह्याचाच दुसरा अर्थ असा,की सोनिया-राहुल ह्या द्वयीला जे काही सांगायचं असतं ते  दिग्विजयसिंग ह्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतं . शब्दभ्रमकार अथवा व्हेंट्रीलॉकिट असतो.तोच आपले ओठ सुद्धा नं हलवता बोलत असतो,पण आपल्याला वाटत असतं की त्याच्या हातातला बाहुला बोलतोय. तेच इथेही घडत असतं.दिग्विजयसिंग बोलताहेत असं आपल्याला वाटत असतं,ते प्रत्यक्षात मायलेकांचे बोल असतात. पक्षात पंतप्रधानपदाचा उमेदवार आधी घोषित करायची परंपरा असती तरी हात दाखवून अवलक्षण कोण करून घेईल? आर्य चाणक्य ह्यांनी सांगितलं आहेच की व्यापार  करणाऱ्याच्या चवथ्या पिढीत तो व्यापार लयाला जातो.नेहरू-इंदिरा-राजीव ह्यांच्यानंतरची राहुल गांधी ही चवथीपिढी! त्यापेक्षा विदेशी मूळ आडवं आलं आणि टेक्निकल बाबीमुळे पंतप्रधानपदी अधिकृतरीत्या जरी विराजमान होता नाही आलं ,तरी कुणी एक प्यादं तिथे बसवून खरी सत्ता आपल्या हाती ठेवणे अधिक सोयीचे नाही का? तेच मॉडेल पुढेमागे  राहुल गांधीही राबवतील. मात्र सद्यस्थिती बघता काँग्रेस पक्ष सत्तेत येण्याची दूर-दूरपर्यंत चिन्हे नाहीत. 

सोशल मिडिया आणि लोकांच्या चर्चांत भारताचे पंतप्रधान म्हणून सध्या एकाच व्यक्तीकडे मोठ्या आशेनं बघितलं जातंय,ती म्हणजे नरेंद्र मोदी.एवढ्यातली ही सत्य घटना !दिल्लीत राहणारे आमचे एक तरुण परिचित पर्यटनासाठी त्यांच्या कुटुंबियांसमवेत नुकतेच गुजरात मध्ये गेले होते.तिथे कसे कोण जाणे,पण त्यांचं पैशाचं पाकीट हरवलं.त्या पाकिटात पैसे आणि ड्रायव्हिंग लायसन्स सारख्या महत्वाच्या गोष्टी पण होत्या. त्यांना तिथे सांगण्यात आलं की  काळजी करू नका,तुमच्या पाकिटात तुमचा पत्ता वगैरे असेल तर ते पाकीट तुमच्या घरी नक्की येईल. ते दिल्लीत परतले आणि त्यांना एक फोन आला की असं असंपाकीट तुमच्या  पत्त्यावर रवाना करण्यात आलंय. त्यांना त्यांचं पैशाचं पाकीट मिळालं ,तर आत त्यांचे सर्व पैसे आणि अन्य महत्वाच्या गोष्टी अगदी जशाच्या तशा होत्या.मोदींचं गुजरात हे असं आहे!

निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे. राजकारणाची आणि सत्ताकारणाची दिशा बदलते आहे. हा बदल कुठल्या दिशेने होतो आहे,ह्याचेही स्पष्ट संकेत दिसू लागलेले आहेत.        

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home