Saturday, May 17, 2014

राजकारण घाला चुलीत; देशाच्या विकासाचं बोला !
-रश्मी घटवाई 
भारताच्या एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोकसंख्या स्त्रियांची आहे.देशभर लक्ष्मी,सरस्वती, दुर्गा ह्या देवी-देवता पूजल्या जातात.मात्र असे असूनही समाजात स्त्रीचे स्थान गौण आहे आणि त्याहीपेक्षा दुर्गती म्हणजे तिच्यावर अत्याचार होत आहेत.स्त्री सुरक्षित नाही.ती एकटी दुकटी बाहेर पडायलाही कचरते आहे. "जब आधा भारत नारी है ,तो फिर क्यों वह बेचारी है ?"असं हा अर्धा भारत उरलेल्या अर्ध्या भारताला विचारतो आहे.
अगदी आकडेवारीच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर २०११ सालच्या जनगणनेनुसार भारतात एकूण लोकसंख्येच्या 48.46%टक्के महिला आहेत.घटनेनुसार मतदानाचा समान अधिकार महिलांना मिळाला असला तरी राजकारणात तरी महिलांची संख्या नगण्यच आहे.ते पुरुष-बहुल क्षेत्र राहिलेलं आहे. १५ व्या लोकसभेत निवडून आलेल्या महिलांची संख्या ६१ आहे. "बडे बदलाव के लिये छोटी शुरुवात" तर ही खचितच नाही . 
एक मात्र नक्की !राजकारण गेलं चुलीत असं, नाक मुरडून नं म्हणता उलट मोठ्या संख्येनं स्त्रिया राजकारणावर चर्चा करताहेत.नोएडा मधल्या २४ ते ३५वर्षे  वयोगटातल्या तरुण स्त्रियांशी मी संवाद साधून "गेल्या दहा वर्षातल्या सरकारनी तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या का आणि आता १६व्या लोकसभेत येऊ घातलेल्या सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत,"ह्याबद्दलची त्यांची मतं जाणून घेतली. 
"मी चंडीगढची आहे.मी होमिओपॅथीमध्ये M.D.केलं आहे.अडवाणीजी,अटलबिहारी वाजपेयीजी ,सुषमा स्वराज,साध्वी ऋतंभरा यांची भाषणे मी ऐकली,तेव्हा मला वाटलं की,अरे हे लोक देशाचा, देशाच्या कल्याणाचा विचार करताहेत,देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्य करण्यासाठी इच्छुक आहेत. नरेंद्र मोदी ह्यांना मी बऱ्याच वर्षांपूर्वी पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीच्या वेळी पाहिलं होतं ,तेव्हा त्यांच्या व्यक्तीत्वानी आणि कार्यपद्धतीनी सगळेच प्रभावीत झाले होते.त्यामुळे आता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी येतील आणि भारताला एका उंचीवर नेउन ठेवतील,याची मला खात्री आहे. येणाऱ्या सरकारकडून मला खूप अपेक्षा आहेत.वाढत्या महागाईपासून सर्वांची सुटका व्हावी. देशात पायाभूत सुविधा,इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट घडावं ,ज्यामुळे रोजगारनिर्मिती पण होईल. शाळेतल्या मुलांना शाळा संपल्यावर मिलिटरी ट्रेनिंग घेणं सक्तीचं करावं आणि जाती-धर्म ,प्रांत ह्यांवर आधारित कुठल्याही प्रकारचं आरक्षण बंद करून केवळ आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं,तेही केवळ एका पिढी पुरतं म्हणजेच केवळ गरिबांनाच आरक्षण मिळावं,आणि तेही एका पिढीत!दुसऱ्या पिढीत नव्हे,जेणेकरून इतरांनाही गरीबीतून बाहेर पडण्याची संधी मिळेल आणि आपला देश समृद्ध आणि आत्मनिर्भर होईल " असं नोएडातल्या डॉक्टर योगिनी सूद-पाठक सांगतात . 
"मोदी ने चाय बेचीं, कलाम ने बेचा अख़बार 
सोनिया ने देश बेचा, मनमोहन ने स्वाभिमान
'केजरी' ने अन्ना को बेचा, हुए देशभक्त हैरान
मक्कारों ने खोल दी फिर 'आप' की दुकान।।
कौन भला कर सकता सबका, अब तो लो पहचान
"नमो" को लाना है,फिर गाना 'मेरा देश महान' ",डॉ. योगिनी सू-पाठक कवितेच्या रूपात सांगतात.                  
उपमा ही दिल्ली युनिव्हर्सिटीमधून " योगा "मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेली (M. A. in Yoga ) तरुणी नोएडा मध्ये मोठ्या-मोठ्या कंपन्या आणि त्यांच्या निवासाच्या कॉलनीं मध्ये योगा शिकवते . तिचा रोष आहे की निवडणुकांमध्ये पक्ष मोठी मोठी आश्वासने देऊन सत्तेवर येतात. मात्र सत्तेत आल्यावर काहीच करत नाहीत. तिचा त्याहून अधिक रोष समाजाच्या मानसिकतेवर आहे,की नारीला अबला मानलं जातं . दुर्गा,काली,लक्ष्मी,सरस्वतीच्या रुपात बघितलंच जात नाही."नारी कहीं भी सुरक्षित नहीं है ।उसे खिलौना माना जा रहा है । "ती उद्वेगानं म्हणते."पहिले दिल्लीत केवळ महिलांसाठी अशी विशेष बस DTC चालवायची . ती बंद करण्यात आली .केवळ महिलांसाठी सर्वत्र अशा बसेस चालवल्या गेल्या पाहिजेत.शाळां-शाळांतून विद्यार्थ्यांचं मानसिक आणि शारीरिक संतुलन  योग्य रहावं यावर भर दिल्या जावा ,म्हणजेच पुढे एक चांगली संस्कारित पिढी निर्माण होईल आणि समाजात नारीला सन्मानानं वागवलं जाईल ,"उपमा सांगते. तिच्या मते लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनीच योगाभ्यास केला पाहिजे.
लता पंत ही तरुणी दिल्लीत कार्यरत आहे. तिच्या मते महिलांसाठी सर्वात महत्वाचा असलेला मुद्दा एकमेव आहे,तो म्हणजे तिची सुरक्षा.आज तरुण मुली शिक्षण व नोकरीनिमित्त घराबाहेर जाते,ती सुरक्षित राहिली पाहिजे.येणाऱ्या सरकारनं प्राधान्य क्रमानं "विमेन'स सेफ्टी "कडे लक्ष द्यावं,असं  ती म्हणते.मुलींना स्वयंरोजगारासाठी सरकारनं मदत करावी आणि प्रोत्साहन द्यावं,असं तिला वाटतं .
   
वेगवेगळ्या स्तरांतल्या तरुण स्त्रियांशी मी चर्चा केली,तेव्हा जाणवलं की अगदी काहीच स्त्रियांना अरविंद केजडीवाल राजकारणात चमत्कार करतील असं वाटतं आहे. "काँग्रेस आणि भाजपानं काहीच केलं  नाही .ह्या देशात नोकऱ्या नाहीत, उच्च शिक्षण धड नाही आणि महिलाही सुरक्षित नाहीत.मग आम्ही ह्या देशात का रहावं ,अन्य देशांत का जाऊ नये,"असं भारताबाहेर उच्च शिक्षण घेऊन तिथे नोकरी करणाऱ्या काही तरुणींना वाटतं आहे. त्यांच्या मते  अरविंद केजडीवाल हेच काय ते एकमेव आशेचा किरण आहेत. मात्र ज्या  तरुण स्त्रियांशी मी चर्चा केली त्यांपैकी जवळ जवळ सर्वच जणींनी     गेल्या दहा वर्षातल्या काँग्रेसप्रणीत सरकारच्या कार्यपद्धतीवर स्पष्ट नाराजी व्यक्त करीत सडकून टीका केली. "खबरदार!राजकारण घाला चुलीत आणि भ्रष्टाचाराला आळा घालून देशाच्या विकासाचं बोला !" असा सल्ला त्या काँग्रेस पक्षाच्या भ्रष्ट नेत्यांना देतात. मात्र बहुसंख्य तरुण मुलींना नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावेत असं वाटतं आहे."त्यांनी गुजरातचा कायापालट केला, आता सबंध भारतातही विकासाच्या दृष्टीने मोठी पाऊले उचलली जातील आणि जगात लवकरच आपल्या देशाचे नाव खूप आदराने घेतले जाईल",असे त्यांना वाटते आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home