Saturday, May 17, 2014

शैले शैले न माणिक्यं...
-रश्मी घटवाई 


शैले शैले न माणिक्यं, मौक्तिकं न गजे गजे ।
साधवो न हि सर्वत्र, चंदनं न वने वने ॥
सगळ्यांच पर्वतांवर काही मौल्यवान रत्ने-माणके आढळत नाहीत, किंवा सगळ्यांच हत्तींच्या मस्तकावर मौल्यवान मोती नसतात,सगळ्यांच वनांत चंदनाची झाडं आढळत नाहीत,तद्वत सगळींच माणसं काही साधू-सज्जन नसतात,ह्या संस्कृत सुभाषिताचा अर्थ १४ फेब्रुवारीला शुक्रवारी रात्री उशीरा अरविंद केजडीवाल ह्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन मोठ्या नाट्यमय रीतीनं सबंध देशाला समजावून सांगितला.तोवर दिल्लीसकट सगळ्या देशवासियांना अरविंद केजडीवाल घसा खरवडून सांगत सुटले होते,की बाकीचे सगळेच्या सगळे राजकारणी चोर आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवणं कसं चूक आहे आणि ते सगळ्या देशाला कसे तोंडघशी पाडतील,तेव्हा त्यांचा अविर्भाव हाच होता की "सौ में से ये सारे के सारे निन्न्यानवे बेइमान,मैं अकेलाही महान…!"आता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यापाठोपाठ गेलेल्यांना त्यांनी स्वत:च तोंडघशी पाडलं आहे.आपण निवडून येताच पहिलं काम म्हणजे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर गेली १५ वर्षे विराजमान असलेल्या शीला दीक्षित यांच्या भ्रष्टाचाराला लोकांसमोर आणणार आणि त्यांना तुरुंगात पाठवणार,सत्तेसाठी आपण काँग्रेस किंवा भाजपा कुणाचंही समर्थन घेणार नाही असं म्हणणाऱ्या केजडीवालांनी सरड्यासारखा पटकन रंग बदलला.मुळात सत्ताग्रहण करण्याचे कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री म्हणून दिल्लीत बंगला, चाळीस हजार रुपये महिना पेन्शन,मोफत विमानप्रवास या व यासारख्या अन्य सर्व सुख-सुविधा मिळवण्यासाठीच त्यांनी ४९ दिवसांचा,औट घटकेचा मुख्यमंत्री होणे पसंत केले असावे असे लोक आता उघडपणे बोलून दाखवताहेत.अन्य पक्षांत आपली वर्णी लागणे कठीण, म्हणून मोठ्या प्रमाणावर vacancy असलेल्या त्या पक्षात लोक जाताहेत,पण हा आम आदमीसाठीचा पक्ष नसून तिथे खास आदमींचीच पार्टी चालली आहे, हे त्या पक्षात मोठ्या उत्साहाने दाखल झालेल्यांना आता उमगले आहे आणि ते आपला रोष उघडपणे व्यक्त करू लागले आहेत.हमारी औकात ही क्या है जी!" म्हणत म्हणत केजडीवाल सत्तेवर आले आणि " हमें कौनसी सरकार चलानी है ?"म्हणत म्हणत ते सत्तेपासून भ्याडपणे दूर झाले,ह्याबद्दल लोकांत खूप नाराजी आहे.केजडीवाल यांना आता पंतप्रधानपद  खुणावू लागले आहे.त्यांचे खरे रूप समोर आल्याने दिल्लीकर जनतेला आपला विश्वासघात झालाय असं वाटतंय.आधीच्या त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढ्याला भुललेले ८० टक्के त्यांचे चाहते "करना-धरना कुछ नहीं है,बस इनको धरना करना है !"असे म्हणत, त्यांच्याकडे पाठ फिरवून चालू लागलेले आहेत." इन से दिल्ली राज्य नहीं संभला,निकले हैं देश संभालने!" असे म्हणत लोक आपली नाराजी व्यक्त करताहेत.गम्मत बघा,मॅगॅसेसे पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर मी स्वत: केजडीवाल यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या आमंत्रणावर त्यांच्या कौशाम्बी ,गाझियाबाद इथल्या घरी जाऊन त्यांची तास-दीड तास मुलाखत घेतली होती आणि त्यावर आधारीत "परिवर्तन" हा माझा अर्धं पानभर लेख लगोलगलोकसत्तामध्ये प्रकाशित झाला होता,त्यानंतर दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना मुलाखतीसाठी वेळ मागितली होती,तेव्हा माझ्या ईमेल वा फोन ची त्यांनी दखलपण घेतली नव्हती. माणसं बदलतात ती अशी! केजडीवाल यांच्यात झालेलं "परिवर्तन"तर आता ठसठशीतपणे जाणवतंय! भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी आघाडी उघडली होती, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की "भ्रष्टाचाराच्या विरोधात माझी मी ठाम उभी आहेकुठल्याही मोठ्यात मोठ्या कामासाठी मी आजवर एका नव्या पैशाची लाच दिली नाही.तरीही मोठी मोठी कामं झालीयेत. वेळ पडलीच तर भ्रष्टाचारी लोकांना मी चांगलं ठणकावून सांगते-माझ्या घरी  भ्रष्टाचाराच्या पैशांचं विष येत नाही आणि मीही ते कुणाला देत नाही.तुम्ही चांगल्या घरचे दिसता आणि तरीही लाच घेता?वेळप्रसंगी नाठाळांच्या माथी काठीही हाणलिए.आपण जर स्वच्छ-शुद्ध असू,आपल्या तत्वांवर खंबीर असू तर कुणाचीही आपल्याला लाच मागायची टाप नसते."भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांच्या कार्यात मीही त्यांच्या जोडीनं कार्य करू इच्छिते असं  मी त्यांना सांगितलं ,तर त्यावर त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या एनजीओ मध्ये ते नऊ लोक आहेत आणि बाहेरच्या कुठल्याही दहाव्या व्यक्तीला त्यात प्रवेश नाहीये! 

गम्मत बघा!अंबानी यांच्या विरोधात केजडीवाल एकीकडे एफआयआर करतात, त्यांच्याच पैशांवर अन्य राजकीय पक्ष पोसले जातात असं म्हणतात आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे स्वघोषित नेते अंबानींच्या देणग्या चालतील म्हणतात!सगळाच उफराटा प्रकार! "मेरी आवाज सुनो, आम्हीही राजकीय आखाड्यात उतरलो आहोत,आम्हाला डोनेशन्स द्या."हे सांगण्यासाठीच त्यांनी कदाचित हाहलकल्लोळ आरंभलेला असावा.गर्दीच्या ठिकाणी एखादा पाकीटमार पाकीट मारल्यावर स्वत:च चोर-चोर असे जोरजोराने ओरडू लागतो.लोक त्या खऱ्या चोराऐवजी काल्पनिक चोराला शोधू लागतात.केजडीवाल यांचे वर्तन थेट याच मानसिकतेची साक्ष देतंय.इतरांना हिशेब मागणारे केजडीवाल त्यांच्या एनजीओला मिळालेल्या विदेशी अनुदानाबाबत मिठाची गुळणी धरून बसलेले आहेत. 
ह्या लिंक्सवर जिज्ञासू वाचकांना ह्याबद्दल आणखी माहिती मिळू शकेल.मात्र सुंभ जळला तरी पीळ जात नाही,त्याप्रमाणे अजूनही,"बाकी सारे बेइमान,मैं अकेलाही महान",हा त्यांचा तोरा कायम आहे. 

जनमत कौल चाचण्या नरेंद्र मोदी ह्यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून लोकांची पसंती असल्याचे दर्शवत आहेत,गुजरात राज्य विकासाच्या बाबतीत भारतातल्या अन्य राज्यांपेक्षा 'सरस' ठरतंय आणि त्याचं श्रेय अर्थातच चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या नरेंद्र मोदी ह्यांनाच आहे,हे विरोधक चांगलेच जाणून आहेत.खुद्द केजडीवाल 'देश में मोदी की लहर है," असं कबूल करताहेत.काँग्रेसला तर ते पुरते कळून चुकले आहे म्हणून मोदींना रोखण्यासाठी त्यांनी केजडीवाल ह्यांना अडथळा म्हणून उभं केलंय.कॅरम खेळतांना नाही का आपली कॉईन जाण्यासारखी नसेल तर खेळाडू दुसऱ्याच्या कॉईन्सच्या मार्गात अडथळे निर्माण करून ठेवतात,जेणेकरून प्रतिस्पर्धी खेळाडूला त्याची कॉईन  पॉकेट मध्ये घालवणे कठीण होईल.काँग्रेसचा तोच डाव आहे. शिवाय त्यांच्या परीनं ते डोळ्यांना कांदे चोळून, गुजरात दंग्यांच्या आठवणी काढून काढून हुंदके देण्याचा केविलवाणा प्रयत्न करताहेत. अर्णब गोस्वामींच्या मुलाखतीत राहुल गांधींनी मोठ्या आवेशात आणि आवेगात गुजरात दंग्यांबद्दल नक्राश्रू ढाळले,पण त्यांचा तो प्रयोग सपशेल फसून उलट १९८४ च्या शीख हत्याकांडाला काँग्रेसच जबाबदार असल्याच्या कबुलीच्या रुपानं अंगलट आला. 
आज प्रत्येक विरोधक उठतो आणि गुजरात दंग्यांबद्दल बोलतो. हिंसा,दंगे,रक्तपात,जीवहानी केव्हाही वाईटच. कुणीच म्हणणार नाही की ते चांगलं आहे.मात्र गुजरात दंग्यांबद्दल खोटे उमाळे आणि गळा काढणाऱ्या एकाच्याही तोंडून गोध्रा हत्याकांडाबद्दल चकार शब्द निघत नाही ,ह्याचं नवल वाटतं. अलीकडेच प्रकाशित झालेला इंटेलिजन्स ब्युरोतल्या निवृत्त संचालकांचा एक उत्कृष्ट लेख माझ्या वाचनात आला. "स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या जातीय हिंसाचाराचा आढावा घेतल्यास दिसून येते की बहुतांश दंगली काँग्रेसशासित राज्यांतच झाल्या. मुस्लिम समाजाचे आपणच एकुलते एक कैवारी आहोत हे त्यांच्या मनात ठसवण्याचा त्या पक्षाचा अहर्निश प्रयत्नच होत आलेला आहे. "(संदर्भ:७ फेब्रुवारी २०१४ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित "सलोखा कुणाला नको आहे " हा विद्याधर वैद्य लिखित लेख.)ते त्या लेखात पुढे लिहितात, १९६६ ते १९७२ या काळात(माझी गुजरातेत नेमणूक असताना) गुजरातेत भाजपचा मागमूस देखील नव्हता,तरी सप्टेंबर १९६९ मध्ये अहमदाबादेत भडकलेले मुस्लिमविरोधी दंगे २००२ च्या हिंसाचारा इतकेच भीषण अमानुष व भयानक होते,त्या दंगलीने  १००० बळी घेतले होते." जिज्ञासू वाचकांनी http://www.gujaratriots.com ह्या संकेतस्थळालापण अवश्य भेट द्यावी,म्हणजे वास्तव काय आहे आणि विरोधक गुजरात दंग्यांबद्दल नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा -आणि तेही न्यायालयाकडून त्यांना क्लीन चिट मिळूनही- खोटानाटा प्रचार कसाकरताहेत आणि का,हे सूज्ञांस लक्षात येईल .“If you tell a lie big enough and keep repeating it, people will eventually come to believe it." म्हणजे एखादी खोटी गोष्ट जोरजोरात ओरडून सतत सांगितली गेली,की कालांतरानं लोकांना ती खरी वाटू लागते. असं गोबेल्सचं म्हणणं होतं.हताश , निराश झालेल्या विरोधकांना आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला "मोदी की लहर " रोखण्यासाठी गोबेल्सच्या तंत्राचा मारा करावा लागतोय,ह्यातच सारं आलं.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home