हे बंध रेशमाचे …
उत्तर प्रदेशानं देशाला १४ पंतप्रधानांपैकी ८ पंतप्रधान दिले आहेत आणि लोकसभेच्या सर्वाधिक म्हणजे ८० जागा उत्तर प्रदेशात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्याबाबतीत उत्तरप्रदेशाला कमालीचे महत्व आहे. देशातली २५ टक्के मतदारांची मते उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांत मिळून असल्यामुळे आणि एकट्या उत्तर प्रदेशात देशभरातल्या एकूण मतदारांपैकी १६ टक्के मतदारांची मते असल्यामुळे उत्तर प्रदेशाला लोकसभा निवडणुकांच्याबाबतीत अनन्यसाधा रण महत्व आहे.
-रश्मी घटवाई
वाराणसी ही वरुणा आणि अस्सी ह्या दोन नद्यांच्या संगमाची नगरी आहे.वामन पुराणानुसार वरुणा आणि अस्सी ह्या दोन नद्या साक्षात परमेश्वराच्या व्यक्त शरीरातून,काळाबरोबरच अस्तित्वात आल्या.ह्या पवित्रतम स्थानाला साक्षात शिव-पार्वतीनं निर्मिलं आणि तिथेच त्यांनी वास्तव्य केलं.वरुणा आणि अस्सी ह्या दोन नद्यांच्या संगमाची नगरी म्हणून तिचं नाव वाराणसी.ती "काशी"म्हणून ओळखली गेली आणि ह्या शिवनगरीला शिव कधीही सोडून जात नाहीत,म्हणून ती अविमुक्ता,आनंदवन,रुद्रवन म्हणूनही ओळखली गेली.तिचं धार्मिक आणि अध्यात्मिक महात्म्य अपरंपार आहे,तसंच अभिजात उत्तर हिंदुस्तानी संगीत आणि वस्त्र -प्रावरणं-विशेषत:बनारसी रेशमी साड्या यांच्यासाठीही वाराणसी सुप्रसिद्ध आहे.
सध्या वाराणसीत प्रत्येक मुखात पानाबरोबरच राजकारण चघळले जाते आहे,रंगते आहे. मुळात वाराणसीत लुटुपुटीचे,पुचाट,मिळमिळीत असे काही नसतेच!प्रतिस्पर्ध्याला आव्हान देत उतरावे,ते आखाड्याच्या लाल मातीत!स्नान करावे,तर गंगाकिनारी!पूजावे,ते काशी-विश्वेश्वराला! न्याहारीत शुद्ध तुपातली गरम-गरम जिलबी-रबडी हाणावी,लोटाभर दूध रिचवावे!सगळे काही 'तबियत से'!अंतर्बाह्य वाराणसीकराला वरवरचे,पोकळ,कमअस्सल असले काही रुचत नाही; नाणे कसे खणखणीत वाजायला हवे!
36,82,194 लोकसंख्येच्या वारा णसी नगरीनं 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत,"न दागी हैं न दोषी हैं,मुरली मनोहर जोशी हैं,ही घोषणा देणाऱ्या डॉ.मुरली मनोहर जोशी यांना 2,03,122 मते देऊन-टक्केवारीच्या भाषेत 30.52 टक्के मते देऊन विजयी केलं .2009 मध्ये डॉ.मुरली मनोहर जोशी यांना"श्रेष्ठ संसद"ह्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.त्यांनी पराभूत केलेला 1,85,911 मते-27.94 टक् के मिळवून द्वितीय स्थानावर आलेला प्रतिस्पर्धी बहुजन समाज पार्टी (बसपा)चा उमेदवार मुख्तार अन्सारी मात्र "दागी है और दोषी भी है".त्यामुळेच बहनजींनी त्याची हकालपट्टी केली.दागी आणि दोषी असलेला हा गुंडपुंड स्वत:चा पक्ष स्थापून 2012 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मउमधून चवथ्यांदा जिंकला.भारतात राजकारणात गुंडपुंड असल्याचं हे मूर्तीमंत उदाहरण.जनतेनंच पोटतिडकीनं अशा गुंडापुंडांना राजकारणातून हद्दपार केलं पाहिजे. गुंडपुंड असूनही वाराणसीतली 15.9 टक्के मुस्लिम मते त्याला मिळतात,म्हणजे मुस्लिम मतदाताच नव्हे;तर भाजपाच्या विरोधातले अन्य किती लोक किती डोळेझाक करून बेजबाबदारपणे मतदान करतात,हे लक्षात येतं.तिसऱ्या स्थानावर समाजवादी पार्टीच्या अजय राय ह्या उमेदवाराला 1,23,874 म्हणजे18.61 टक्के मते मिळाली; तर 2009च्या सार्वत्रिक निवडणुकीत,2004 च्या निवडणुकीत जिंकलेल्या डॉ. राजेश कुमार मिश्रा ह्या काँग्रेसच्या उमेदवाराला, वाराणसीतून दिल्या गेलेल्या एकूण 6,65,490 मतांपै की अवघी 66,386 म्हणजे 9.98 टक्के मते मिळाली आणि चवथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
१६व्या लोकसभेसाठीची 2014 सालची ही निवडणूक ह्यावेळी 'काही वेगळी 'असल्याचं जाणवतंय , कारण गेल्या दहा वर्षांत भ्रष्टाचारी काँग्रेसप्रणित सरकारनं लाखो करोडो रुपयांचे घोटाळे करून सर्वसामान्य माणसाला जगणं कठीण करून सोडलं.कोळसा घोटाळा तर ह्या सर्वांचा राजा!त्यामुळे जनता आता हे भ्रष्ट सरकार उलथून टाकायला अगदी आतुर झालेली आहे आणि प्रत्येक जण घरचं कार्य असल्यागत निवडणुकीकडे बघतोय!चीननं केलेल्या त्यांच्या सैनिकांच्या भारतातल्या घुसखोरीच्या आणि भूभागावारच्या अतिक्रमणाच्या संदर्भात काँग्रेसप्रणित सरकारनं घेतलेली पुचाट भूमिका पाहता सर्वसामान्य माणसाला मोदींमध्येच आपला आणि देशाचा तारणहार दिसतो आहे . पर्यावरणाच्या संदर्भात म्हटलं जातं की थिंक ग्लोबली अॅन्ड अॅक्ट लोकली . म्हणजे मोठ्या घटकाचा विचार करीत लहान घटकावर काम करायचं .भाजपाच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना पण सध्या पर्यावरणाच्या ह्या सूत्राचा आधार घ्यावासा वाटतो आहे .भाजपाच्या कुठल्याही उमेदवाराला मत द्यायचं ते मोदींना डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांना पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवण्यासाठीच;ह्या कल्पनेनं भाजपाचा मतदार प्रेरित झालेला आहे.वाराणसीची जनता मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून देण्यास निवडून उत्सुक आहे;मात् र दोन जागांवरून निवडणूक लढवणाऱ्या मोदींनी आपल्याला वाऱ्यावर सोडून देऊ नये,हे वाराणसीचे बंध रेशमाचे जपावेत,ही त्यांची अपेक्षा आहे.तसेही उत्तर प्रदेशानं देशाला १४ पंतप्रधानांपैकी ८ पंतप्रधान दिले आहेत आणि लोकसभेच्या सर्वाधिक म्हणजे ८० जागा उत्तर प्रदेशात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्याबाबतीत उत् तर प्रदेशाला कमालीचे महत्व आहे. देशातली २५ टक्के मतदारांची मते उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांत मिळून असल्यामुळे आणि एकट्या उत्तर प्रदेशात देशभरातल्या एकूण मतदारांपैकी १६ टक्के मतदारांची मते असल्यामुळे उत्तरप्रदेशाला लोकसभा निवडणुकांच्या बाबतीत अनन्यसाधारण महत्व आहे.
कोळसा घोटाळ्यात, आदर्श घोटाळ्यात आणि अन्य अनेक घोटाळ्यांत लिप्त असूनही लाजलज्जा सोडलेल्या काँग्रेसनं तसं तर ह्या निवडणुकीत आपण सपशेल हारणार हे गृहीत धरलं आहे आणि वारा येईल त्या दिशेला शीड वळवणारे त्यांचे दिग्गज शेंदाड शिपाई आधीच निवडणुकीच्या रणांगणातून कोणी कुठले कारण देऊन तर कोणी आणखी कुठले-पळ काढते झालेत!काँग्रेसच्या पापात वाटेकरी असलेल्या त्यांच्या सरकारातल्या साथीदारांनीही बदलत्या वाऱ्याची दिशा बघून अन्यत्र चाचपणी सुरू केली.आपण जिंकणार नाही ,हे स्वच्छ दिसत असताना कुणी मतदानाची शाई पुसून चलाखीनं पुन्हा दुसऱ्यांदा मतदान करण्याचे सल्ले दिले!कदाचित आतापावेतो ते जिंकून येण्यामागे हेच गमक असावं ! चंद्रबळ आणून काँग्रेसनं शेवटच्या स्लॉग ओव्हर्स मध्ये जनमत आपल्या बाजूने वळवायचा एक केविलवाणा प्रयत्न करून पाहिलाय ,पण शेवटी काँग्रेस समजतेय तेवढी भारताची जनता खुळी नाहीये .काँग्रेसची सहावी यादी प्रसिद्ध झाली,त्यात आणि आता हा लेख लिहितेवेळीसुद्धा, वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही .
बसपा आणि सपा यांच्यामधून विस्तव जात नाही ,कोणाची पुंडाई अधिक हे ठरवणे अवघड ,मात्र ह्या पक्षानं उमेदवारी दिली नाही तर त्या पक्षात जाणाऱ्या आयाराम-गयाराम मंडळीसाठी बहुधा दोन्ही पक्षांचा स्तर एक असावा .(उत्तर प्रदेशातल्या नोएडा लोकसभा मतदारसंघातल्या मागच्या निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर जिंकलेल्या खासदारानं आता सपाचा आसरा घेतला आहे. ) वाराणसीमधून गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सपाकडून निवडणूक लढवलेला उमेदवार आता काँग्रेसची उमेदवारी मिळवण्याची स्वप्नं बघतो आहे आणि दुसऱ्याच पक्षातर्फे वाराणसीमधून गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक लढवलेल्या उमेदवाराला आता बसपानं नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देऊ केली आहे. वाराणसीच्या निवडणुकीच्या आखाड्यात भाजपा
च्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बसपाकडून विजय प्रकाश जयस्वाल,सपाकडून कैलाश चौरासिया, स्वतंत्र उमेदवार मुख्तार अन्सारी ,तृणमूल काँग्रेसकडून इंदिरा तिवारी ,सीपीआयएम कडून हिरालाल यादव ,आम आदमी पार्टीचे अरविंद केजडीवाल निवडणूक लढवताहेत .
निवडणुकांमध्ये कुठल्याच पक्षाला कमी लेखून चालणार नाही ,हे जरी खरे असले तरी स्वत:च्या वक्तव्यांवर स्वत:च घूमजाव करणारे,कोलांट उड्या मारणारे अरविंद केजडीवाल वाराणसीत जाऊन खरे म्हणजे थट्टेचा विषय बनले.त्यांच्या समवेत अजिबात गर्दी नव्हती,जे कोणी त्यांच्या समवेत होते,ते दिल्लीहून त्यांनी आणलेले होते.वाराणसी मधले स्थानिक नव्हतेच असे वाराणसी मधले लोक सांगताहेत . न्यूज मध्ये राहण्यासाठी त्यांनी स्वत:च आपल्या पक्षाच्या लोकांकडून शाई आणि अंडी स्वत:वर फेकून घेतलीत . मागे योगेंद्र यादव यांच्या तोंडाला काळे फासणारा दुसरा तिसरा प्रकार नसून न्यूज मध्ये राहण्यासाठी त्यांनी स्वत:च आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून काळे फासून घेतले असावे,म्हणून तर त्यांनी त्याच्या विरोधात तक्रार केली नाही ! वाराणसीमधल्या तथाकथित गर्दीचे त्यांनी आपल्या वेबसाईट वर टाकलेले फोटो म्हणजे फोटोशॉपची कृपा असल्याचं उघडकीला आलं. त्यांचे 'फंड रेझिंग 'डिनर्स म्हणजे दुसरे तिसरे काही नसून काळा पैसा पांढरा करण्याची शक्कल असल्याची लोकांची ठाम धारणा आहे. अरविंद केजडीवाल चोर चोर म्हणून आपले बोट प्रत्येकाकडे रोखताहेत ,त्यावेळी त्यांच्या पंजाची तीन बोटे त्यांच्याचकडे रोखलेली आहेत,हे ते विसरतात .राहता राहिला अंगठा!तो मात्र वाराणसी मधले मतदार त्यांना दाखवणार आहेतच!

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home